खाजगी शिक्षणसंस्था व खाजगी शाळांना फी वाढीस पुणे जिल्ह्यात परवानगी देवू नये - बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा जाधव

पुणे(प्रतिनिधी)-देशात व राज्यात कोरोनाचे संकट असून यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत असून गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येत आहे. देशासह राज्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्येक वर्षी खाजगी शाळा. शिक्षण संस्था त्यांच्या फीमध्ये १०% वाढ करतात. यावर्षी कोरोनामळे पालकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. अनेक पालकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे किंवा काही दिवस ब्रेक मिळाला आहे. अनेक जण आपले उद्योगधंदे बंद करून घरी बसले आहेत. जिल्ह्यातील व शहरातील शाळांच्या वार्षिक फी ३० हजारपासून ७ लाखा-पर्यंत आहेत. यात १०% वाढ म्हणजे ३ हजार ते ७० हजार . रुपयांचा जादा भुर्दंड पालकांना पडू शकतो. सद्य परिस्थिती आणखी काही दिवस अशी राहिली तर ती वाढीव फी भरणे पालकांना अवघड होणार आहे. त्यामुळे खाजगी शाळांनी आहे त्या फीमध्ये ५०% सवलत दिली पाहिजे. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत खाजगी शाळांना फी वाढवता येणार नाही व आहे त्यामध्ये ५०% सूट द्यावी असा जीआर शिक्षणमंत्र्यांनी काढावा. ज्या शिक्षण संस्था व शाळा जादा फी घेतील त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी पुणेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी एका निवेदनाद्वारे महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.