मेंढपाळांना सुविधा , सहानुभूती , संरक्षण दिले जावे . सादिक खाटीक यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी

आटपाडी दि . ३ ( प्रतिनिधी )
 भटकंतीत असणाऱ्या माणदेशी मेंढपाळांसह सर्वच मेंढपाळांना सुविधा , सहानुभूती आणि संरक्षण दिले जावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे . 
             मुख्यमंत्री ना . श्री . उध्दवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री ना .श्री . अजितदादा पवार साहेब , सांगली,  सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अनुक्रमे ना .श्री . जयंतराव पाटील साहेब , ना.श्री. बाळासाहेब पाटील साहेब आणि ना.श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांना ईमेल , वॉटस अपच्या माध्यमातून पाठविलेल्या निवेदनाद्वारे सादिक खाटीक यांनी या सर्वांचे लक्ष वेधले आहे . 
                सांगली ,सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या एक सलग सरहद्दीवरील आटपाडी, खानापूर , माण , खटाव , सांगोला , मंगळवेढा, जत , कवठेमहांकाळ या माणदेशी  तालुक्यातील शेकडो मेंढके ( मेंढपाळ ) आपल्या हजारो मेंढयासह भटकंती करीत जवळच्या , लांबच्या तालुक्या , जिल्हयात मेंढया चराईसाठी गेले आहेत , पश्चिमेला कोल्हापूर , साताऱ्याच्या पुढे तळकोकण,  पुण्यापर्यत आणि पूर्वेला मराठवाडयाच्या शिवेपर्यत या मेंढपाळाची भटकंती पिढयान पिढया चालु आहे .  मराठवाडयातील मेंढपाळ पूणे सातारा परिसरात जा - ये करीत 
असतात .या भटकंतीत मेंढया , शेळ्या , कुत्री , एखादे घोडे , गाई आणि सोबत पत्नीसह परिवारातल्या एक - दोघांसह भटकंतीतील हे कुटुंब वाडया , वस्त्या , रानोमाळ गावोगाव फिरत असते . सकाळी आठ वाजल्या पासून सायंकाळी ६ वाजेपर्यत उन्हातान्हात मेंढरे चारत पंधरा वीस किलोमीटरची पायपीट करताना या सर्वांचे होणारे हाल , यांच्या जीवघेण्या जगण्याच्या संघर्षाची करूण कहाणी व्यतित करीत असते. असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी प्रत्येक मेंढपाळ कुटुंबासोबत किमान खंडी (२०), ते पाच खंडी लहान जनावरे भटकंतीवर असतात . मिळेल तिथे रानोमाळ चारायचे, सापडेल तिथे पाणी पाजायचे आणि कोणी शेतकऱ्यांने बसू दिल्यास त्याच्या शेता - शिवारात किंवा उघडया बोडक्या माळरानावर वाघर ( जाळी ) लावून जनावरांसमवेत रात ( रात्र ) काढायची . उन , वारा , प्रसंगी वादळी पाऊस झेलत मेंढपाळांच्या या दिनचर्येत स्वत : च्या होणाऱ्या जीवघेण्या ओढीबरोबरच पोटाचीही मोठी आबळ होत असते . हे चित्र पारंपारीक मेंढपाळीचे वर्षानुवर्षाचे आहे , दिवाळीनंतर मेंढया चारण्यासाठी म्हणून हे मेंढपाळ आपल्या गावातून पर तालुका , जिल्ह्याकडे मार्गक्रमण ( कुच) करतात . साधारणतः सात आठ महिने म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यत त्यांच्या घर परतीची भटकंती सुरूच असते. असे या निवेदनात म्हटले आहे . 
             तथापि दीड-  दोन महिन्यापासून भारतभर घोंगावू लागलेल्या कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर या मेंढपाळ बांधवाची मोठी ससेहोलपट सुरु असून दुसऱ्या तालुक्यातले , जिल्ह्यातले असल्याच्या कारणावरून या मेंढपाळांना काही ठिकाणी झिडकारले जावू लागले आहे . सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे  मेंढपाळांचे ७ ग्रुप सोलापूर जिल्ह्याच्याच मोहोळ तालुक्यातील विविध गावात वास्तव्यास आहेत . तथापि कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सापत्नपणाची वागणूक मिळत असून काही शेतकऱ्यांबरोबरच पोलीस पाटील यांच्या कडून त्रास दिला जात असल्याचे लोटेवाडीचे आमचे युवा मित्र सागर बजीरंग लवटे  यांनी  दुरध्वनी आणि वॉटस अप वरून माझ्या निदर्शनास आणल्याचे तसेच  मोहोळ तालुक्यात विविध गावात सध्या भटकंतीवर असलेल्या त्या संबंधीत मेंढपाळांची नावे व मोबाईल नंबर पाठवून याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सागर लवटे यांनी आपणास सुचित केल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी , मोहोळ तालुक्यातल्या स्थानीक शेतकरी , जागा मालकासह शासनस्तरावरील पोलीस पाटील वगैरेचा मेंढपाळाना त्रास होवू लागल्याबाबत शासनाचे लक्ष वेधले आहे . 
                 आजच्या घडीला राज्यातल्या शेकडो गावात असे मेंढपाळ , मेंढपाळीसाठी भटकंतीवर आहेत. त्यांच्या बाबतीत असे सापत्न भावाचे प्रकार घडत नाहीत ना ? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे .
कोरोणा संकटांच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन मुळे भल्या भल्यांची पुरती जिरली आहे . दैनंदिन जीवनाच्या वस्तू, पदार्थ मिळविताना प्रत्येकाला कसरत करावी लागत आहे . मात्र परक्या तालुक्यातल्या , जिल्ह्यातल्या या मेंढपाळांना त्यांच्या दैनंदिन गरजासाठी लागणारे अन्न, पाणी आणि जनावरांसाठी चारा,पाणी , सुरक्षित निवारा मिळविताना काय यातायात करावी लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी , आणि अशा महामारीच्या संकटाच्या स्थितीत असहाय , अगतिक , गरीब , उपेक्षित मेंढपाळांच्यावर तुसडेपणातून , अथवा कोरोणा आजाराच्या भीतीतून कोणी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या आक्षेप घेत असेल , अन्याय करीत असेल तर ते मानवतेला मारक ठरणार आहे . सर्वच ठिकाणच्या मेंढपाळाना पुरेसे मास्क , सॅनिटायझर यांचे वाटप करून कोरोणा संबधी दक्षतेचे आणि कायदयासंबधी माहीती सांगीतल्यास ते त्याचे निश्चित पालन करतील. मेंढपाळ , त्यांच्या मेंढयाचा वावर बहुंताश वेळी डोंगर कपारी , दऱ्या खोऱ्यात,  रानोमाळच असल्याने त्यांना कोरोणा बाबत दक्षता घेणे अडचणीचे ठरणार नाही . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी , आपले राहते गाव सोडून परक्या ठिकाणी अडकलेल्या सर्वच मेंढपाळ , त्यांच्या जनावरांना शासनाने शासनस्तरावरून  त्यांच्या , त्यांच्या गावी आणून सोडावे. शंका येत असल्यास , वाटत असल्यास  त्यांच्या आरोग्याची चिकित्सा केली जावी , गावी आणल्यावर या मेंढपाळ कुटुंबाना  किमान दहा हजार रुपये आर्थीक मदत आणि त्यांच्या मेंढयाना दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध करून देवून शासनाने त्यांना आधार दयावा, किंवा परक्या ठिकाणी असणाऱ्या भटकंतीतल्या सर्वच मेंढपाळांची तातडीने माहीती गोळा करून त्यांना त्या त्या ठिकाणी किमान दोन महिने पुरेल इतका शिधा प्रत्येक आठवडयाला थोडा थोडा , वेगवेगळ्या भटकंतीच्या गावात उपलब्ध करून दिला जावा , दैनंदीन गरजेच्या वस्तू पुरवाव्यात. स्थानीक जनतेला अथवा कर्मचाऱ्यांना सांगून त्यां सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , सायंकाळी मुक्कामास आणि भटकंतीत सहाय्यक ठरेल असा शासनस्तरावरचा रितसर परवानगीचा लॅमिनेटेड पास प्रत्येक मेंढ्पाळाला दिला जावा  , लॉकडाऊन संपेपर्यत मेंढपाळांशी मोबाईलवर संपर्क करून आठवड्यातून एकदा त्यांच्या फिरतीच्या ठिकाणी जावून त्यांना आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य सुविधांचा लाभ दिला जावा . यासाठी शासनस्तरावर तातडीने योग्य ती उपाययोजना करून सर्व गाव वाडया वस्त्यांवर मेंढपाळाबाबतचे प्रबोधन ध्वनीक्षेपकांवरून करून शासनाने केलेल्या निर्णयाचे सुतोवाच सर्वत्र केले जावे. 
                उन्हाळ्याच्या ४ महिन्यात राज्यात  बारमाही पिकाची शेते ( उस वगैरे ) सोडून इतर सर्वच पिकावू शेते मोकळी झालेली असतात ,अशा खाजगी मालकीच्या शेतांसह उघडया बोडक्या माळरानावर मेंढया , शेळ्या मोफत चारणेस ,  तेथील असणाऱ्या विहीरी , हौद  , वगैरे खाजगी अथवा शासकीय ठिकाणच्या पाणवठयावर पाणी पाजणेस सर्वानाच अधिकार देणारा आणि रात्री मेंढया बसविणे अथवा मोफत वसती करणेस  परवानगी देणारा नवा कायदा अस्तित्वात आणावा .  शेतात अग्रहक्काने मेंढया बसवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार शेतात मेंढया बसविण्याचा मोबादला मेंढपाळांना पारंपारीक पध्दतीने दिला जातो त्याला समर्थन देणारे सुतोवाच या नव्या शासकीय भूमिकेत असावे . यामुळे अग्रहक्काने मेंढया, शेळ्या चारण्यासाठी सर्वच मोकळी राने मोफत मिळाल्याने लहान जनावरांच्या संख्येत मोठी वाढ होईल , शेळ्या मेंढयाच्या ज्यादा पैदासीमुळे मांसाच्या मोठया प्रमाणावरील मागणीचा तुटवडा कमी होऊन मटनाच्या वाढीव दराला लगाम लागेल .मेंढपाळ पशुपालकांना अच्छे दिन आल्याने या मेंढपाळ व्यवसायाकडे शेकडो तरूण आकर्षिले जातील , शेळ्या , मेंढया पालन करणाऱ्या मेंढपाळामध्ये हिंदू धनगर समाज बांधव ९८ टक्के इतक्या प्रचंड संख्येने असून इतर जातीय आणि इतर धर्मीय मेंढपाळांची संख्या २ टक्क्यापर्यत असण्याची शक्यता आहे . राज्यात लाखोंच्या घरात मेंढपाळ परिवाराची लोकसंख्या  असल्याने मेंढपाळा संबधीच्या वरील मागण्या सत्यात आल्यास लाखो मेंढपाळ शासनास धन्यवाद, दुवाँ देतील. तरी लॉकडाऊनच्या काळात मेंढपाळांना आवश्यक सुविधा , सहानुभुती आणि  संरक्षण  देण्यासाठी तसेच  मेंढपाळा संदर्भात दीर्घकालीन फायदयाचे निर्णयासाठी शासनाने तातडीने पाऊले टाकावीत अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .